महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा हे भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असलेल्या त्रिपुराच्या प्रतिष्ठित माणिक्य घराण्यातील आहेत. प्रगतीशील दृष्टिकोन हे माणिक्य शासकांचे वैशिष्ट्य मानले जाते. १९४१ साली त्यांनी त्रिपुराचे पहिले लिखित संविधान सादर केले, ज्यामध्ये स्वयंसहायता, सहकार्य आणि राज्याप्रती समर्पण अशा नागरी आदर्शांवर भर देण्यात आला होता.
श्री. जिष्णू देव वर्मा यांनी १९९३ साली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आणि लवकरच ते, सक्रिय संघटनात्मक नेतृत्व म्हणून उदयास आले. सुरूवातीच्या काळात त्रिपुराचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून, आणि नंतर राज्य एककाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
२०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत श्री. जिष्णू देव वर्मा यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि एकूण मतांपैकी तब्बल ८९.३३ टक्के मते जिंकून मोठा विजय मिळवला. त्रिपुरातील डाव्या आघाडीच्या २५ वर्षांच्या राजवटीच्या समाप्तीनंतर, २०१८ साली त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. आपल्या कार्यकाळात त्यांनी वित्त, ग्रामविकास आणि वीज असे महत्वाची खाती सांभाळली, तसेच प्रकल्प वितरण, आर्थिक व्यवस्थापन आणि वेळेवर अंमलबजावणी या बाबींवर लक्ष केंद्रित केले.
पर्यावरणपूरक कृषी पद्धती, अक्षय ऊर्जा आणि उपजीविकेच्या संधींच्या माध्यमातून शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी राबविलेला ‘बायो व्हिलेज २.०’ हा एक उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे. ईशान्य परिषद सल्लागार समितीच्या माध्यमातून त्यांनी ईशान्य प्रदेशासंबंधी धोरणात्मक चर्चांमध्ये देखील योगदान दिले आहे. त्याचबरोबर इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH) त्रिपुरा चॅप्टरचे संयोजक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
एक बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे श्री. जिष्णू देव वर्मा हे एक कुशल कलाकार, कवी आणि लेखक सुद्धा आहेत. ‘चिल्ड्रन ऑफ वॉटर गॉडेस’ आणि ‘मास्टर ऑफ टाइम’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तेलंगणाचे राज्यपाल म्हणून ३१ जुलै २०२४ रोजी त्यांची नियुक्ती झाली, आणि त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द प्रशासन, विकास आणि सांस्कृतिक वारशाप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवणारी आहे.